रब्बी हंगामाकरीता शेतीसाठी दोन तर उन्हाळ्यात पिण्याचे पाण्यासाठी एक अशी मिळून तीन आवर्तने गोदावरी उजव्या कालव्यांना सोडण्यात येणार आहेत, त्यातील रब्बीचे पहिले आवर्तन जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सोडण्याचा निर्णय करतानाच निळवंडे लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी देण्याची ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
गोदावरी कालव्यांना आगामी रब्बी हंगाम व उन्हाळ्यात पिण्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्यासंदर्भात मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी व निळवंडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
बैठकीस भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. रघुनाथ बोठे, राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानदेव गोंदकर, माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर, माजी नगराध्यक्ष सोपानकाका सदाफळ, ज्येष्ठ नेते मोहनराव सदाफळ,
तसेच गोदावरी कालवा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश आंबरे, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, निळवंडे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता ठाकरे, अभियंता स्वप्निल काळे, शिडींचे प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, की धरणातील उपलब्ध पाणी साठ्याची क्षमता बघता, रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतीचे दोन आवर्तने तर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याचे एक आवर्तन सोडले जाईल. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने सध्या लगेच पाण्याची आवश्यकता भासत नाही,
त्यामुळे रब्बीसाठीचे पहिले आवर्तन जानेवारी महिन्याचे पहिल्या आठवड्यात सोडू, त्यानंतर दुसरे आवर्तन संभाव्य परिस्थिती बघता किती दिवसाच्या अंतराने सोडता येईल व त्याचा शेतकरी बांधवांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल, याचा विचार करून पाणी सोडण्याचा विचार या बैठकीत झाला.
मार्च- एप्रिलच्या दरम्यान पिण्याचे आवर्तन सोडता येईल व त्यानंतर धरणातील उर्वरित पाण्याची परिस्थिती पाहून पुन्हा एखादे आवर्तन देणे शक्य आहे का, याचाही विचार करून अधिकाऱ्यांनी नियोजन करतानाच, मिळणाऱ्या आवर्तनातून शेतकऱ्यांनी सुव्यवस्थित योग्य पद्धतीने नियोजन करून पाण्याचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून निळवंडे कालव्यांद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले पकी, त्यामुळे जिरायत भागातील आडगाव, खडकेवाके, पिंपळस, पिंपरी निर्मळ यासह इतरही गावातील पाझर तलाव भरले गेले आहेत.
उर्वरित राहिलेल्या गावांच्या पाझर तलावातही पाणी सोडण्याची ग्वाही देवून, भविष्यातील पाणीटंचाईचे संकट काहीसे दूर होण्यास मदत होणार असल्याचे विखे पाटील महणाले.
याप्रसंगी मोहनराव सदाफळ, अॅड. रघुनाथ बोठे, सावळीविहीरचे माजी सरपंच बाळासाहेब जपे, शरद गोडे, संरपंच श्रीमती पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. राजेंद्र निकाळे यांनी सूत्रसंचालन केले.
मंत्री विखे पाटील यांचा माजी सरपंच सचिन मुरादे तसेच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व नागरिक, निमगाव कोन्हाळे गावचे सरपंच कैलास कातोरे व ग्रामस्थ, निमगाव सावळविहीर यासह इतर गावातील खंडकरी शेतकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच बाळासाहेब जपे व अन्य शेतकरी बांधवांनी मंत्री विखे पाटील यांचा सत्कार केला.