लोकनियुक्त सरपंचावरीलअविश्वास ठराव बारगळला! या तालुक्यातील घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर तहसिलदार अर्चना पागिरे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची सभा होऊन मतदान झाले.

परंतु, बहुमत सिद्ध न झाल्याने सरपंच आव्हाड यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला. लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास दाखल होण्याची ही तालुक्यातील बहुदा पहिलीच घटना होती.

सदस्यांना विश्वासात न घेणे , मनमानी कारभार करणे, कामात अनियमितता, ऑनलाईन टेंडर ऐवजी ऑफलाईन टेंडर करणे, ग्रामपंचायतीत उपस्थिती कमी असे आरोप सदस्यांनी करून सरपंच आव्हाड यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता.

ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार अविश्वास ठराव समंत होण्यासाठी २/३ सदस्यांचे बहुमत आवश्यक असते तर विशेष सभेत अविश्वास ठराव समंत होण्यासाठी ३/४ सदस्यांचे बहुमत आवश्यक असते.

तहसिलदार पागिरे यांच्या उपस्थितीत अविश्वास ठरावावर चर्चा व हात उंचावून मतदान घेण्यात आले. या सभेला सहा सदस्य उपस्थित राहिले तर सरपंचासह चार सदस्य अनुपस्थित राहिले.

दहा पैकी उपस्थित सहा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान केले. परंतु बहुमत सिद्ध न झाल्याने सरपंच बाळासाहेब आव्हाड यांच्यावरील अविश्वास ठराव समंत न झाल्याचे तहसिलदार पागिरे यांनी जाहीर करत सभेचे कामकाज संपवले.

अहमदनगर लाईव्ह 24