अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम सुरु असून, लग्नसमारंभ मोठ्या थाटात होण्यासाठी वारेमाप खर्च करण्याची पध्दत रुढ झाली आहे.
या रुढीला फाटा देत शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ना हुंडा, ना खर्च करीत रमैनी पद्धतीने खंडू पुंड (रा. नेवासा) व वैशाली कोरडे (रा. अकोले) यांचा विवाह थाटात पार पडला.
रमैनी पद्धतीच्या विवाह सोहळ्यात कोणत्याही स्वरुपाचा हुंडा दिला अथवा घेतला जात नाही. संसरोपयोगी वस्तू देखील दिल्या जात नाही,
आहेर-मानपान, कोणत्याही प्रकारची पूजा, साखरपुडा, हळदी, मंगलाष्टके, अक्षदा, हार, फटाके, बॅण्ड, वरातीला फाटा दिला जातो.
रुढी, परंपरेला पूर्णत: फाटा देऊन पुज्य कर्विदेव कबीर व त्यांचे अवतार जगतगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या आर्शिवादाने 17 मिनीटात रमैनी आरती करुन साध्या पध्दतीने हा विवाह लावण्यात येतो.
संत रामपालजी महाराजांनी समाजसुधारणेची चळवळ चालवून रमैनी विवाह पध्दत रुढ केली. या विवाह पध्दतीमुळे अनेक परिवारांचे कल्याण झाले.
तसेच त्यांनी स्त्री भ्रुण हत्या, नशा मुक्ती, भ्रष्टाचार मुक्ती, जात, वर्ण व धर्मभेद थांबविण्यासाठी पुढाकार घेऊन समाजात जागृती केली. रमैनी विवाह सोहळा आदर्श पध्दती असून,
यामुळे आई-वडिलांना लग्नाच्या खर्चाचे ओझे वाटत नाही व ते कर्जबाजारी होण्यापासून वाचतात. या विवाह पध्दतीची समाजाला गरज असल्याची भावना चंद्रकांतदास पाटील यांनी व्यक्त केली.
हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी उत्तमदास कदम, चंद्रकांतदास पाटील, गणेशदास कासार, प्रमोददास भापकर आदींनी परिश्रम घेतले.