अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- दिव्यांग मुलांसाठी मागील पंधरा वर्षांपासून नगर शहरामध्ये अनाम प्रेम संस्था काम करत आहे.
स्नेहलयाच्या माध्यमातून प्रेरणा घेत सुरू केलेल्या कामाचा आज वटवृक्ष झाला असून अनामप्रेमचे कार्य हे नगर शहराचा देशामध्ये नावलौकिक वाढविणारे आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने बळकटीकरण सप्ताहाचा शुभारंभ अनामप्रेम संस्थेतील दिव्यांग मुलांसाठी मिष्ठान्न भोजन वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला. त्यावेळी काळे बोलत होते.
काळे म्हणाले की, ना. बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिलं. यांच्या वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव गारदे यांनी पुढाकार घेत या संस्थेतील दिव्यांग मुलांसाठी मिष्ठान्न भोजन वाटप कार्यक्रमाचे केलेले आयोजन कौतुकास्पद आहे.
गारदे यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी ही समाजातील अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. अनामप्रेमच्या वतीने ब्रेल लीपीच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना सामान्य मुलांप्रमाणेच दिले जाणारे शिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम, जॉब फॉर युथ या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणारा रोजगार यामुळे शिक्षणाबरोबरच या मुलांच्या हाताला काम देत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्याचे संस्थेने केलेले काम अभिमानास्पद आहे.
महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संस्थेचे असणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकतीने संस्थेच्या पाठीशी उभी आहे, असे यावेळी काळे म्हणाले. कार्यक्रमाचे संयोजक अनंतराव गारदे म्हणाले की, अनामप्रेम संस्थेच्या कार्याचा मी सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे. अत्यंत तळमळीने संस्थेचे कार्य सुरू असते.
संस्थेतील दिव्यांग मुलांची धडपड करत आयुष्याला आकार देत जगण्याची जिद्द ही समाजाला निश्चितपणे अनेक गोष्टींची शिकवण देणारी आहे. माजी महापौर दीप चव्हाण, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजामभाई जहागीरदार, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे आदींची यावेळी भाषणे झाली.
यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, रियाज शेख, अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, सहसचिव नीता बर्वे, महिला सेवादल शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, अनिसभाई चुडीवाल, डॉ.रिजवान अहमद, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, उषाताई भगत,
सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष सौरभ रणदिवे, सचिन गारदे, सहसचिव गणेश आपरे, शरीफ सय्यद, कल्पना खंडागळे, वाहिद शेख, सीमा बनकर, इम्रान बागवान, श्यामवेल तिजोरे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.