‘नो मास्क नो दर्शन’, नियमांचे पालन आवश्यक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- पुंडलिक वरदे… हरि विठ्ठल..श्रीज्ञानदेव तुकाराम’ असा गजर करत श्रीक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर माउलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान आणि पैस खांब असलेले मंदिर सोमवारी गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते उघडण्यात आले.

कोरोना महामारीमुळे मागील आठ महिन्यांपासून मंदिर बंद होते. राज्य शासनाने मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वारकरी, भक्त, संत-महंत व कीर्तनकारांत उत्साह संचारला. मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप आपल्या हाताने उघडले.

यावेळी महाराष्ट्र वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, शिवाजी होन, भिकाजी खोसे, भय्या कावरे, भानुदास गटकळ, संदीप आढाव, गोरख भराट आदी उपस्थित होते. देशमुख यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात माउलींचे मूर्तींमंत रूप असलेल्या पैस खांबास विधिवत अभिषेक घालण्यात आला.

मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. मंदिरात प्रवेश करताच घंटेचा निनाद व हरिनामाचा जप ऐकावयास मिळाल्याने वातावरण मंगलमय झाले होते.

माउली व पैस खांबाचे दर्शन घेतांना भाविकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, मास्क लावूनच दर्शन घ्यावे. ‘नो मास्क नो दर्शन’ नियमावली अंमलात आणली जाईल. कोरोनाचे संकट अजूनही गेलेले नसल्याने सर्वांनी नियमांचे पालन करत सामाजिक अंतर ठेवत पालन करावे.” – शिवाजी महाराज देशमुख, नेवासे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24