अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पारनेर,राहाता या तालुक्यातील विविध गावांत जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन घोषीत केले आहे.
काही गावात यापूर्वीच लॉकडाऊन केले होते त्यात परत वाढ केल्याने त्या त्या गावातील व्यापारी आणि ग्रामस्थ या लॉकडाऊनच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
यात पारनेर तालुक्यात कान्हूरपठार,भाळवणी व पाथर्डी तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिला होता. कान्हूरपठार गावठाण हद्दीत कोरोनाचा एकही रुग्ण नसताना परिसरातील व गावांतील वाडी- वस्तीवरील रुग्ण गावातल्याच यादीत आल्याने आकडेवारी वाढलेली दिसत आहे.
यातील बरेच रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तरीही त्यांची नावे पुन्हा रुग्ण यादीत आले आहेत. या सर्व बाबींचे वर्गीकरण होणे महत्त्वाचे होते; परंतू प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि विसंगतीमुळे आज संपूर्ण गावाला व व्यापाऱ्यांना याची मोठी किंमत मोजावी लागत आहे.
पारनेर तालुक्यातील काही गावांत कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने भाळवणीसह तालुक्यातील बारा गावांमध्ये सलग चौदा दिवस लॉकडाउन जाहीर केल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहेत. येत्या तीन तारखेपर्यंत बंदचे आदेश असल्याने व्यापारी दुकाने उघडण्याची तयारी करत असताना
जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा तालुक्यातील भाळवणीसह सहा गावे दहा दिवस बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या सणासुदीचे दिवस जवळ आले असताना या सर्वच गावांमधील व्यवहार ठप्प झाले असून, सर्वांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे लहान – मोठे सर्वच व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.