अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- प्रत्येक राजकीय कामाला ग्रहण लागते. त्यात काही नवीन नाही. विघ्न हे येतच असतात, त्याशिवाय श्रीरामपुरात कोणतेही काम होत नाही. मात्र पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन कामे केली पाहिजे.
प्रत्येकाने आपापल्या पक्षाची भूमिका मांडावी. त्याला विरोध करण्याचे कारण नाही. मात्र काही कामांमध्ये सहकार्य करण्याचे भान जपले पाहिजे. प्रत्येक काम हे मला विचारूनच झाले पाहिजे, असे जर लोकप्रतिनिधीला वाटत असेल तर कोणीही सत्तेचे ताम्रपट घेऊन आलेले नाही.
श्रीरामपूर तालुका हा कोणाचीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे. पंचायत समितीच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी विखे बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार सदाशिव लोखंडे,
भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, शरद नवले, सभापती संगीता शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, दीपक पटारे उपस्थित होते. विखे म्हणाले, पंचायत समितीच्या इमारतीच्या रुपाने जर विकासाचे मंदिर उभे राहत असेल तर त्यात राजकारण केले जाऊ नये. भूमिपूजनाला राजकीय वळण दिले गेले.
मात्र मंत्री अब्दुल सत्तार हे यावेळी उपस्थित राहिले. त्यामुळे सर्व विरोध मावळला. कार्यक्रमावर बहिष्कार टाकणारे लोक हे आमच्याच मांडवाखालून गेले आहेत. कोणाला काय वाटते याचा मी विचार करत नाही, अशी टीका आमदार विखे यांनी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved