काही पदाधिकारी, कार्यकर्ते साथ सोडून गेले आहेत. अनेक जण कारण नसताना अफवा पसरवत आहेत. अजूनही सर्व प्रमुख पदाधिकारी माझ्या सोबतच आहेत. तर काही जण दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे आहेत. असे करणाऱ्यांनी इकडेच राहावे किंवा तिकडे जावे.
देश कोणाच्या हातात आहे, राज्य कोणाच्या हातात आहे आणि निधी आणण्याची ताकद कोणामध्ये आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. शंका-कुशंका मनात आणू नये आणि कोणाचे कोणावाचून अडत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर,
नाना काटे, पंडित गवळी, नाना लोंढे, जगदीश शेट्टी, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र जगताप, अरुण पवार, मंगला कदम, प्रशांत शितोळे, शाम लांडे, राजू मिसाळ, माया बारणे, अपर्णा डोके, विनोद नढे, अनुराधा गोफणे, राजू बनसोडे, प्रसाद शेट्टी आदींसह माजी नगरसेवक, विविध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, काही लोक गैरसमज पसरवत आहेत. संविधानाला चुकूनही धक्का लागणार नाही. दूध, गॅस, लाडकी बहीण व इतर सर्व योजना आहेत. यावर आता ७५ हजार कोटी सरकार खर्च करतेय.
अजित दादांचा वादा आहे. वाद्याचा पक्का आहे. पण हे सगळे हवे असेल. या योजना हव्या असतील, तर परत महायुतीला निवडून द्या. काम कसे करून घ्यायचे ते मी बघतो. अल्पसंख्याक लोकांचे मतपरिवर्तन करा ! पवार पुढे म्हणाले, आपले शहर हे मिनीभारत आहे. या ठिकाणी अनेक जातीधर्मांचे लोक राहतात.
सध्या नगरसेवक नसल्याने कामांना वेळ लागत आहे. जी सार्वजनिक कामे राहिली आहेत, ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना महापालिका आयुक्तांना केल्या आहेत. यंदा जे बजेट दिले आहे ते विकास आणि व्हिजनचे ऐतिहासिक बजेट आहे. याद्वारे अनेक योजना आणल्या आहेत.
पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फक्त विकासाची भाषा लक्षात ठेवावी. जनतेची सेवा आणि संवाद हाच नरेटिव्ह आहे. वरिष्ठांच्या सूचना पाळाव्या आणि
त्याच पद्धतीने काम करावे. मी साहेबांचा अपमान केला नाही डीपीडीसी बैठकीमध्ये करण्यात आलेल्या आरोपांवर पवार यांनी स्पष्टीकरण दिले.
डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकलं याचा रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण म्हणतात की, मी साहेबांना बोलू दिले नाही, मी भेदभाव करणारा नेता नाही, विरोधकांना पण माहिती आहे, काल काही गोष्टी घडल्या, अडीच तास मीटिंग झाली.
सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह अनेकजण होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या की मावळमध्ये जास्त निधी दिला. यावर शेळके यांनी म्हटले की, तुम्ही सारखा हा उल्लेख करताहात. कुणाला दुखवायचं नाही. मी साहेबांचा अपमान केला नाही, हा आरोप माणजे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, असे अजित पवार म्हणाले.
भोसरीत लक्ष द्यावे…
विशेषतः भोसरी परिसरात जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. वरिष्ठ पातळीवर एकत्र बसून जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वैयक्तिक ताकद दाखवावी लागणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे. असेही अजित पवार म्हणाले.