अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. विविध समस्या शेतकऱ्यांसमोर असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
याविरुद्ध आवाज उठवणीसाठी नुकतेच शेतकऱ्यांसह अनेक पक्षीयांनी आंदोलनही केले. परंतु आता सरकारने दूध उत्पादकांच्या समस्यांचा एकत्रित विचार केला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आंदोलन झाल्यांनतर सरकारकडून अनेक वेळा आश्वासने दिली जातात. केवळ काही काळासाठी दूध उत्पादकांना 1 किंवा 2 रुपये भाव वाढ देऊन हा प्रश्न सुटणारा नाही, तर दूध व्यवसायासाठी शाश्वत धोरण ठरवले पाहिजे.
तसेच दूध उत्पादक शेतकर्यांना किमान हमी भाव कसा मिळेल हे सरकारने पाहिले तरच दूध उत्पादक आणि व्यवसाय टिकणार असल्याचे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात खाजगी दूध संघ, सहकारी संघ, दूध संकलन केंद्र आदींद्वारे दुधाचे नियोजन केले जाते. ही सर्व क्षेत्रे राजकीय प्रभावाखाली कार्यरत आहेत.
त्यामुळे दुर्दैवाने यातील महत्वाचा घटक असणारा दूध उत्पादक शासनाकडून नेहमीच दुर्लक्षित राहतो. राजकीय नेतृत्व दूध उत्पादकांच्या बाजूने राहण्याऐवजी संघ, डेअरी यांच्या बाजूने राहिले असल्याचे चित्र आहे.
शासनाने मध्यस्थ साखळीवर नियंत्रण आणले तर दूध आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात, असे सर्वसामान्य दूध उत्पादकाला वाटते.
राज्य सरकारने कायम स्वरूपाच्या ठोस उपाययोजना ठरवण्याची आवश्यकता आहे. सलग चार माहिने दूध धंदा तोट्यात करून शेतकरी आता हतबल झाला आहे. त्यामुळे यावर शाश्वत आणि ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved