Ahmednagar News : जानेवारी ते डिसेंबर २३ पर्यंत मुदत संपणाऱ्या शेवगाव तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या ५ नोव्हेंबर रोजी पार पडत असून, आज (दि. १६) पासून निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असल्याने प्रशासकीय पातळीवरून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.
याबाबत ते म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ढोरसडे/ अंत्रे, शहरटाकळी, खरडगाव, हिंगणगाव ने, थाटे, लोळेगाव, सामनगाव, बऱ्हाणपूर, वडूले बु., आव्हाने,
बालमटाकळी, लाडळगाव, भगूर, वरूर बु, लाखेफळ, वडुले खु, एरंडगाव भागवत, एरंडगाव समसुद देवटाकळी, मुंगी, गोळेगाव, दिवटे, खडके, मडके, शेकटे खु., बोधेगाव, कऱ्हेटाकळी, या २७ गावांतील निवडणुका होत असून,
निवडणुका जाहीर होताच या गावातील सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर प्रभागनिहाय उमेदवार चाचपणी करून थेट जनतेतून निवडून जाणाऱ्या सरपंच पदाचे उमेदवारही जवळपास निश्चित केले असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांची अनेकांची जुळवाजुळव झाली असून,
काही ठिकाणी ती सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. इतर सर्व निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे दिवसें दिवस महत्त्व वाढत असून, या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसल्याने गावपातळीवर विविध पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन आपल्या सोयीनुसार पॅनल व आघाड्या तयार करून निवडणुकांना सामोरे जात आहेत.
त्यातच महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने आरक्षित जागेवर निवडून जाणाऱ्या महिलांसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
२७ गावांतून ९४ प्रभागांतून २५३ सदस्य व २७ सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असून, निवडणुकीसाठी ७० हजार ३३३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.