अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील नरसाळी ते देवळाली प्रवरा या रस्त्याचे काम होवून एक वर्षही झाले नाही, तोच हा रस्ता पूर्णपणे उखडला असून
या रस्त्याचे काम तातडीने करण्यात आले नाही तर संबधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा टॅक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुथा यांनी दिला आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात मुथा यांनी पुढे म्हटले आहे की, नरसाळी ते देवळाली प्रवरा या रस्त्याचे काम पूर्ण होउन एक वर्षाचा कालावधीही लोटला नाही, तोच हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे.
या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. काम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षापयंर्त त्या रस्त्याच्या मेंटेनन्सची जबाबदारी ही त्या ठेकेदाराची असताना संबधितांकडून काम करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
रस्त्यावरील खड्ड्यात अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झालेले आहेत. बऱ्याच गाड्यांचे टायर फुटणे, पाठे तुटणे यामुळे गाड्यांचा मेंटेनन्स वाढला आहे.
या रस्त्याने जाताना दुचाकी व चारचाकी वाहन धाराकांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचेही जाणे- येणे याच रस्त्याने आहे.
परंतु या अधिकाऱ्यांना या खड्ड्यांचा त्रास कसा होत नाही,असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने खराब झालेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, अन्यथा अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा मुथा यांनी दिला आहे.