अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : कर्ज फेडूनही ‘नील’ दाखला मिळेना, महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published by
Ahmednagarlive24 Office

कर्ज फेडूनही नील दाखला न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका महिलेने चक्क आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ही घटना घडली. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.

सौ. पुष्पा विजय सुरवसे असे आंदोलनकर्त्या महिलेचे नाव आहे. नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील ही महिला मूळची रहिवाशी आहे. दरम्यान, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. सुरवसे हिच्या पतीने सन २००० मध्ये एका पतसंस्थेकडून ६ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड केल्यावरही संस्थेने कर्ज नीलचा दाखला दिला नव्हता. याबाबत सदर महिला व तिच्या पतीने नेवासा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला.

मात्र, त्याची दखल न घेतल्याने तिने नगरच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज केला. तरीही न्याय न मिळाल्याने २२ डिसेंबर रोजी तिने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनीशिंगणापुर पोलीस ठाण्यातील महिला पो.हे. कॉ. अंजली शिंदे, पो.ना. वंदना काळे, व कोतवाली पोलिस ठाण्यातील पो.हे.कॉ. सोनावणे यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

नेवासा सहाय्यक निबंधक देवीदास घोडेचोर, महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे मॅनेजर सतीष लोखंडे, चेअरमन गोरक्षनाथ विश्वनाथ कुरे हे देखील घटनास्थळी आले. आजच्या आजच नील दाखला देण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्ते महिला व तिच्या पतीने केली.

त्यांना सहाय्यक निबंधक घोडेचोर व इतर कर्मचारी समजावुन सांगत असतांना पुष्पा सुरवसे यांनी त्यांचे जवळच्या पर्समध्ये असलेली पेट्रोलने भरलेली प्लॅस्टीकची बाटली अचानक काढून स्वतःचे अंगावर पेट्रोल ओतून घेवू लागली.

हे पाहताच महिला पो.हे.कॉ. अंजली शिंदे, पो.ना. वंदना काळे या दोघींनी त्याचेकडील पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली व त्यांना आत्मदहनापासुन परावृत्त केले. त्यानंतर त्यांना पतीसह कोतवाली पोलिस ठाण्यात आणले.

महिला पो. हे. कॉ. अंजली शिंदे यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पुष्पा सुरवसे या महिले विरुद्ध आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office