Ahmednagar News : शहराजवळ जामखेड महामार्गालगत औटेवाडीतील सप्रेवस्ती येथे भरदुपारी दीड वाजण्याच्या सुमारास किसन सप्रे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून कपाटातील अंदाजे ३ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी समीर अभंग करत आहेत. या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.७ एप्रिल रोजी किसन ओटेवाडी तलाव शेजारील शेतात दैनंदिन कामानिमित्त गेले होते.
तर त्यांची पत्नी पारगाव येथे नातेवाईकांकडे गेल्या आणि त्यांची सून दुपारी ९ वाजण्याच्या दरम्यान घराच्या मागे असलेल्या शेतात पाण्याची मोटार बंद करण्यासाठी घराला कुलप लावुन गेली होती. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात उचला पाचक करत ३ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
ही घटना फिर्यादी यांची सून शेतातून घरी परतल्या नंतर लक्षात आली. घटनेची माहिती फियांदी यांनी पोलीस प्रशासनाला कळविली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत श्बानपथक पाचारण करत तपास केला असता श्वानपथकाने आढळगाव रस्त्यापर्यंत माग घेतला.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओटेवाडी परिसरात भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे,
रात्रीच्या अंधारात नाही तर आता भरदिवसा चोऱ्या, घरफोड्या होत असल्याच्या घटना समोर येत आहे. चोरट्यांची वाढती दहशत कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.