अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-आर्थिक सेवा व हक्कविषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
या संपात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह राज्यातील २२ हजार ग्रामसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक संवर्ग कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. यात कोरोनामुळे काही कर्मचाऱ्यांना जीवही गमवावा लागला आहे.
असे असताना सरकार ग्रामसेवक संवर्गाच्या अनेक न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. याआधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने ग्रामसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
अतिरिक्त कामामुळे ग्रामसेवक खूप व्यस्त, त्रस्त झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक वर्षापासून संघटना शासन दरबारी रास्त हक्कांसाठी पाठपुरावा करत आहे. पण शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद नाही.
अशा अनेक कारणांमुळे ग्रामसेवक राज्यातील लाक्षणिक संपात सहभागी होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक संवर्ग पूर्ण ताकदीनिशी आंदोलन यशस्वी करील, असा विश्वास राज्य अध्यक्ष ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved