अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्हा प्राथ शिक्षक बॅकेतील १०० वर्षाच्या पुरुषप्रधान संचालक मंडळाच्या कारभाराला कंटाळून शिक्षक बँकेत सभासदांच्या हितासाठी साजिर महिला प्राथमिक शिक्षक मंडळ सर्व सभासदांच्या हक्कांसाठी लढणार असल्याची जोरदार चर्चा शिक्षकांमध्ये आहे.
अहमदनगरच्या प्राथमिक शिक्षकांची शिक्षक बँक ही राज्यात प्रसिद्ध आहे. बॅकेत ५० % म्हणजे ,जवळजवळ ५२०० महिला सभासद आहेत .बँकेत मुद्द्याची लढाई कधी कधी अचानक गुद्द्यावर येते. लहान मुलांना ज्ञानाचे डोस पाजणारा शिक्षक या बँकेच्या सर्वसाधारण मीटिंगमध्ये एकमेकांवर बाह्या सावरतो, एकमेकांवर धावून जातो.
कधी अंडी फेकली जातात अशा अनेक शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या घटना या बँकेच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने लोकांच्या पुढे आलेल्या आहेत. या आजपर्यंतच्या घडलेल्या घटनांमध्ये महिला शिक्षकांचा काडीमात्र संबंध आलेला नाही. या गोंधळामुळे वार्षीक सभेस ५० महिला देखील उपस्थित राहत नाहीत.
आजपर्यंत १०० वर्ष बँकेत पुरुषप्रधान संस्कृतीचे संचालक मंडळ बँकेत कारभार पाहत आले आहेत. या १०० वर्षाच्या पुरुषप्रधान संचालक मंडळाच्या कारभाराला कंटाळून शिक्षक बँकेत सभासदांच्या हितासाठी साजिर महिला प्राथमिक शिक्षक मंडळ सर्व सभासदांच्या हक्कांसाठी लढणार आहे.
शिक्षक बँकेत शिक्षकांच्या जिल्ह्यातील सर्व मंडळातील महिलांना सामावून घेणारे,आणि सर्व सभासदांना न्याय देणारे साजिर महिला प्राथमिक शिक्षक मंडळ अहमदनगर, लवकरच ॲक्शन मोडमध्ये येणार असून, सभासदांना मोठा आर्थिक लाभ मिळवून देणे आणि शिक्षकांची समाजातील पत उंचावण्यासाठी साजिर महिला प्राथमिक शिक्षक मंडळ काम करणार आहे.
साजिर महिला मंडळ स्थापन करताना, शिक्षणाची गंगोत्री असणारी माता सावित्रीचा सा, राजमाता जिजाऊंचा जी ,आणि दीनांची माता रमाईचा र,घेऊन हे साजिर मंडळ स्थापन झाले आहे. आणि त्या माता माउलींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच साजिर मंडळ बँकेचा चिकाटीने व काटकसरीने कारभार करणार असल्याचे ,साजिर महिला मंडळाच्या संस्थापक सदस्य महिलांनी सांगितले आहे.