Ahmednagar News : न्याय हक्कासाठी आंदोलन, उपोषण करणे आता अवघड झाले असून शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर बसलेल्या एका उपोषणकर्त्यां दाम्पत्याचे पैशासह सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारचे खाते बँकेत नसताना, त्याच्या नावावर सुमारे दहा लाख रुपये कर्ज घेतल्याचा प्रकार येथील एका बँकेत नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागणीसाठी राजू शिंदे यांनी शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उपोषणकत्यां शिंदे दाम्पत्याचे पैशासह सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याची मागणी केली जात आहे.
शहरातील एका बँकेचे शाखा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तालुक्यातील जुने नायगाव येथील राजू शिंदे यांनी म्हटले आहे की, माझे कोणत्याही प्रकारचे खाते आपल्या बँकेत नसतानाही माझ्या नावावर सुमारे दहा लाख रुपये कर्ज घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे.
मला शेतीसाठी एका बँकेतून कर्ज घ्यायचे होते. त्यासाठी सदर बँकेने माझे सिबिल तपासले असता, वरील घडलेला प्रकार माझ्या लक्षात आला.आपल्या बँकेकडे माझ्या नावावर कर्ज कोणी काढले, त्या खात्याचा खाते नंबर काय, याबाबत माहिती विचारली असता, बँकेतून मला कर्ज खात्याचा उतारा दिला.
त्यानुसार माझ्या नावे कोणी कर्ज काढले, याबाबत उल्लेख आढळला नाही, तुमच्या या प्रकारामुळे माझे सिबिल खराब झाले असून मला कोणतीही बँक कर्ज देत नाही. आपल्या चुकीमुळे शिंदे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन मला न्याय मिळण्यासाठी महात्मा गांधी पुतळा येथे उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीचे आधार, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे बँकेत जमा केली होती. त्यानुसार त्याला कापणी आणि वाहतूक प्रकारातील कर्ज दिले आहे. हे प्रकरण चार-पाच वर्षांपूर्वीचे असून याची चौकशी करण्यात येईल, असे संबधीत बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितले.