अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी संस्थानाने नवी नियमावली जारी केलीय. त्यानुसार आता साईबाबा यांच्या मंदिरातील भाविकांची दर्शन मर्यादा वाढवण्यात आली आहे.
नाताळ सुट्ट्यांसाठी साई संस्थानची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. संस्थानच्या वेबसाईटवरून दर्शन पास घेणे अनिवार्य असणार आहे.
दररोज १२ हजार भाविकांना प्रवेश देणे शक्य होणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अनलॉकनंतर राज्यातील मंदिरे दर्शनासाठी उघडल्यावर शिर्डीत आतापर्यंत रोज ६ हजार भाविकांना दर्शनाची परवानगी मिळत होती.
पण आता रोज १२ हजार भाविक साईंचं दर्शन घेऊ शकणार आहेत. साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन बुकिंग करावं, असं आवाहनही साई संस्थानकडून करण्यात आलं आहे.
नाताळमुळे होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे. मात्र, जास्त गर्दी झाल्यास दर्शन बंद केलं जाणार असल्याचंही संस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
तर सुट्टीच्या दिवशी शिर्डीमध्ये ऑफलाईन बुकिंग काऊंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. १२ हजार भाविकांपैकी ८ हजार भक्तांना ऑनलाईन फ्री पास तर ४ हजार भक्तांना ऑनलाईन पेड पास दिले जाणार आहेत.
३१ डिसेंबरला मंदिर खुलं ठेवायचं की नाही, याबाबत मात्र अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे.