Ahmednagar News:कर्जत येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. वारंवार अशा घटना घडल्याने नगर जिल्हा हॉटस्पॉट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे देशात स्वच्छता अभियान राबवत आहेत, तशी तुम्हीही येथे स्वच्छता मोहीम राबवा,’ अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली.
तसेच “राज्यात आता महाविकास आघाडी सरकार नाही. नगरला पालकमंत्री हसन मुश्रीफही नाहीत. राज्यात आता देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी सरकार आहे.
कुणी मस्ती केली तर त्यांच्याकडे सर्व गोष्टींंवर औषध आहे,’ असा सूचक इशाराही राणे यांनी सोमवारी नगर येथे बोलताना दिला. आमदार राणे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी नूपुर शर्मा यांचे स्टेटस ठेवल्याने कर्जतमध्ये हल्ला झालेल्या जखमी सनी ऊर्फ प्रतीक राजेंद्र पवार या युवकाची रुग्णालयात भेट घेतली.
त्यानंतर पोलिस अधीक्षक पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर राणे व पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “अमरावतीची घटना घडली तेव्हा राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. त्यामुळे त्या काळात जिहाद्यांची हिंमत वाढली होती.
पण आता राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे यापुढे कुणालाही हिंदू धर्माला टार्गेट करण्याची हिंमत करू देणार नाही,’ असा इशारा आमदार राणे यांनी दिला.
सनी पवार या युवकावर हल्ला झाल्यावर तो जुन्या भांडणातून झाल्याचे मुद्दामहून सांगितले जात आहे. मात्र, नूपुर शर्माचा डीपी ठेवतो, असे म्हणून त्याला जीवघेणी मारहाण झाली आहे.
त्याची प्रकृती गंभीर आहे. तो मृत्यूशी झुंज देत आहे. प्रकृतीच्या कारणाने त्याला रुग्णालयात कुणाला भेटू दिले जात नाही.
पण त्याच्याशी आरोपींनी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व नूपुर शर्मा यांच्याविरोधी भाष्य आहे व त्याचे पुरावे आम्ही पोलिसांना देऊन या प्रकरणातील मुख्य आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केल्याचेही राणे यांनी सांगितले.