Ahmednagar News : महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू असून लक्षवेधीच्या माध्यमांतून आमदार सत्यजीत तांबेंनी डेंटल उपचारांचा देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्याची मागणी केली. आ. सत्यजीत तांबेंची मागणी लक्षात घेऊन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या योजनेत डेंटल उपचारांचा देखील समावेश करण्याचे आश्वासन दिले.
आरोग्य योजनेचा लाभ घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रुग्णालये बोगस रुग्ण दाखवून योजनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात या सगळ्यावर सरकार कशाप्रकारे आळा घालणार, असा सवाल आमदार सत्यजीत तांबेंनी सभागृहात उपस्थित केला.
राज्यात ३५० तालुक्यांपैकी १३७ तालुक्यांमध्ये अजूनही योजना लागू झालेली नाही. या १३७ तालुक्यांमध्ये योजनेअंतर्गत एकही दवाखाना किंवा रुग्णालय नाही. त्यांना कशाप्रकारे प्राधान्य देणार आहे. तसेच रुग्णालयांच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असून रुग्णालय बोगस रुग्ण दाखवून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात.
अशा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या रुग्णालयांवर अजूनही ठोस कारवाई झालेली नाही. याबाबत सरकार काही निर्णय घेणार आहे का आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल आमदार सत्यजीत तांबेंनी सभागृहात विचारला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत आल्यानंतर त्यांनी ही योजना पाच लाखांपर्यंत केली. परंतु यातले १.५ लाख इन्शुरन्स कंपनी देणार तर ३.५ लाख सरकार मार्फत दिले जाणार आहेत. ३.५ लाख सरकार कसे देणार, स्कॉलरशिपच्या बाबतीत झालेली फसवणूक आरोग्य योजनेच्या बाबतीत झाली तर ही योजना फसवी योजना होऊ शकते.
त्यामुळे लाभार्थीना पूर्ण पाच लाख रुपये सरकार इन्शुरन्स कंपनी मार्फत देणार का? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. आमदार तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत १००० रुग्णालयांचा समवेश होता.
या योजनेचा लाभ १.५ लाखांपासून ५ लाख करण्यात आला. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी असणाऱ्या अटी काढून टाकल्या आहेत. या योजनेत पूर्वी १३५६ उपचारांचा समावेश होता आता डेंटल उपचारांचा देखील समावेश करण्यात येईल. तसेच ज्या १३७ तालुक्यांमध्ये रुग्णालये नाहीत तिकडे त्वरित रुग्णालया सुरू करण्यात येतील. त्यामुळे यापुढील काळात दातावरील उपचारांचा देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येणार आहे.