Ahmednagar News : दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नगर तालुक्यातील भातोडी येथील तरूणाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीर शहाबुद्दीन पटेल (रा. भातोडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याला मारहाण करणाऱ्या जमावावरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शैलेंद्र शांताराम सरोदे यांनी फिर्याद दिली आहे.
पटेल याने छत्रपती शिवाजी महाराज व टिपु सुलतान यांच्याविषयी एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सदरचा प्रकार रविवारी (दि.३) सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास घडला असून अंमलदार सरोदे यांनी मंगळवारी (दि.५) रात्री उशिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.
दरम्यान सदर व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच गावातील तरुणांचा जमाव संतप्त झाला व त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या जमीर शहाबुद्दीन पटेल याला गावातील खंडागळे वस्ती परिसरात अडवून लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केली.
या मारहाणीत तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी महेश बाबु लबडे व इतर १५ ते १६ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.