अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- ग्रामपंचायतने गावाच्या कार्यक्षेत्रातील नदीपात्रात होत असलेला अवैध वाळूउपसा न होऊ देण्याचा ठराव केला.
मात्र या ठरावाबाबत उद्विग्न होऊन, येथील एक वाळू तस्करांचा पंटर व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकाने पत्रकारास एसटी स्टँडजवळ अडवून, अपमानीत करीत, जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच अनेक लोकांमध्ये एक महिन्याच्या आत जिलेटिनने तुझे घर उडवून देईल अशी धमकी दिली. हा प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे घडला आहे. या प्रकरणी पत्रकार ठवाळ यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला त्या इसमावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
या बाबत सविस्तर असे की, तालुक्यात आढळगाव कार्यक्षेत्रातील देवनदी व घोडेगाव पाझर तलावात अनधिकृत वाळू उपसा होत होता. या बाबत अनेक दिवसांपासून आढळगाव ग्रामपंचायतीमध्ये चर्चा सुरू होती.
हा अनधिकृत गौण खनिज उपसा थांबवण्यासंदर्भात नुकताच सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते आढळगाव कार्यक्षेत्रातील वाळूतस्करी बंद करण्याविषयी ठराव संमत करण्यात आला. हा ठराव झाल्याने येथील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
यातूनच वाळू तस्करांच्या एका पंटरने ठवाळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ठवाळ यांनी यापूर्वी तालुक्यात चालू असलेल्या
अनधिकृत वाळू तस्करीबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर डॉ.राजेंद्र भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना या अवैध गौण खनिज उतख्तन्न थांबवण्यासंदर्भात पत्र दिले आहे.