ऐन दिवाळीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- एकीकडे वर्षाचा सण दिवाळी दोन दिवसांवर आला आहे, तर दुसरीकडे अनेक सरकारी कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेतच आहे. पगाराअभावी कर्मचाऱ्यांची दिवाळी बेरंगी होणार असल्याने कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे.

यातच आता अकोले तालुक्यातील वीज कंपनीतील वीज कामगार ऐन दिवाळीत संपावर जाणार आहे. सानुग्रह अनुदान, बोनस,व पगारवाढीचा दुसरा हप्ता दिवाळी पूर्वी देण्यात यावा या मागणी साठी वीज कंपनीतील वीज कामगार महासंघ सह इतर प्रमुख संघटनाबरोबर बावीस संघटनानी एकत्र येऊन शनिवार दि. 14 रोजी संपाचा इशारा दिला आहे.

अशी माहिती वीज कामगार महासंघाचे जिल्हा सचिव गणेश कुंभारे यांनी दिली. वीज मंडळातील कामगार, अभियंते, अधिकारी यांच्या कार्यरत असणार्‍या सर्व संघटनांनी सर्व कर्मचार्‍यांना नेहमीच्या परंपरेनुसार दिवाळी पूर्वी सानुग्रह अनुदान, बोनस व पगारवाढीचा दुसरा हप्ता याचे वेतन अदा करण्याची मागणी एका पत्रा नुसार 5 नोव्हेंबर रोजी केली होती.

मात्र वीज मंडळ प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही.त्यामुळे सर्व संघटना नाराज होऊन दिवाळी पूर्वी रक्कम अदा न केल्यास गुरुवार दि. 12 रोजी राज्यव्यापी निदर्शने व निषेध सभा आंदोलन करतील, त्यानंतर हि काही निर्णय न झाल्यास शनिवार दि. 14 रोजी सर्व कर्मचारी, अभियंते, अधिकारी व सर्व संघटनांचे सभासद संप करतील असा इशारा वीज प्रशासनाला दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24