अहमदनगर बातम्या

दूध दरप्रश्नी २३ जुलै रोजी कोतूळ ते संगमनेर ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन !

Published by
Ahmednagarlive24 Office

दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतूळ या ठिकाणी शेतकरी गेले १७ दिवस धरणे आंदोलनास बसले आहेत.

दूध हंडी, कोतूळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आता कोतुळ ते संगमनेर या ५५ किलोमीटर अंतरामध्ये शेकडो ट्रॅक्टर व ट्रॉली यांची रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

याबाबत आंदोलकांनी पत्रकात सांगितले, की आंदोलनाच्या १८व्या दिवशी २३ जुलै रोजी या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील शेकडो शेतकरी ट्रॅक्टर व ट्रॉलीवर दूध उत्पादनाशी संबंधित विविध साधने सजवून रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रिव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, पशुखाद्याचे दर कमी करावेत, दूध भेसळ तातडीने थांबवावी, आदी मागण्यासाठी ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.

दूध धंद्यातील सर्व उत्पन्न सरकारच्या धोरणामुळे खासगी व सहकारी दूध संघ व इतरांनी लुटून नेले आहे. शेतकऱ्याला या व्यवसायातून केवळ शेणच शिल्लक राहत आहे. या पार्श्वभूमीवर ते तरी कशाला ठेवता ते शेणही घेऊन जा, अशा प्रकारची शेतकऱ्यांमध्ये भावना आहे.

ट्रॅक्टर रॅलीच्या सुरुवातीला शेणाने भरलेला ट्रॅक्टर असणार असून, हे शेणसुद्धा सरकारने घेऊन जावे, अशा प्रकारची भावना याद्वारे व्यक्त केली जाणार आहे.
कोतूळ येथून निघणारी ही रॅली दूध उत्पादनाचा पट्टा असलेल्या धामणगाव पाट, धामणगाव आवारी, अकोले तहसील कार्यालय, कळस, चिखलीमार्गे, संगमनेर शहरात दाखल होणार आहे. या रॅलीमध्ये अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन आंदोलकांच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील आरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Ahmednagarlive24 Office