Ahmednagar News : जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये एकुण १ लाख ६९ हजार ४३२ नावे मतदान यादीत डबल असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. ऋषिकेश आरोटे यांनी जिल्ह्यातील मतदार याद्यांची पडताळणी केल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे दुबार नावांना त्यांनी आक्षेप घेतला आहे.
डॉ. आरोटे यांनी यापूर्वी संगमनेर तालुक्यातील मतदार याद्यांची पडताळणी केली होती. यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील याद्यांची पडताळणी केली. एकाच व्यक्तीकडे दोन मतदान कार्ड व मतदान यादीत दोन ठिकाणी नावे, दोन स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये नावे हा प्रकार मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये ६ हजार ८८१, अकोले तालुक्यात ८ हजार ६२१, संगमनेर तालुक्यात १८ हजार ०९४, राहाता २१ हजार ४६५, श्रीरामपूर ३३ हजार २२१, नेवासा ९ हजार ५८०, शेवगाव ४ हजार ६९९, पाथर्डी ८ हजार ४५०,
राहुरी १६ हजार २७३ पारनेर ६ हजार ८१३, अहमदनगर २९ हजार ५९०, श्रीगोंदा ७ हजार ९९३, कर्जत ५ हजार २३७, जामखेड २ हजार ५१५, असे एकुण १ लाख ६९ हजार ४३२ दुबार मतदार आढळले आहेत.
जाहिर केलेल्या व प्रशासनाकडे दाखल केलेल्या आकडेवारी व्यतिरिक्त अजून दोन ते सहा हजार मतदार नावे हि दुबार आहेत, असे त्यांनी सांगितले. मतदान यादी व त्याबाबत सुरू असलेल्या कामकाजाकडे चाणाक्ष पद्धतीने लक्ष देणारे डॉ. आरोटे हे वेळोवेळी मतदान यादी संदर्भात संगमनेर तालुक्यात कामकाज करत असतात.
त्यांनी संपूर्ण जिल्ह्यासाठी काम केले आहे. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व अहमदनगर लोकसभेतील १२ विधानसभेतील सर्व मतदान याद्या. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील दुबार नावांची माहिती प्रशासनाकडे व्यक्तीगत व सांकेतिक स्थळांवर मेलद्वारे सादर केली आहे, असे आरोटे यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यात नेवासा विधानसभा वगळता इतर सर्व विधानसभा ह्या तालुक्यानुसार विभाजित होत आहेत. अहमदनगर तालुका ४ विधानसभा तर संगमनेर तालुका तिन विधानसभा क्षेत्रात विभाजित आहेत. दोन तालुका क्षेत्रात एक विधानसभा यात असलेल्या विधानसभा अकोले, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव पाथर्डी, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत जामखेड, पारनेर, येतात.
तालुका नुसार प्रशासन हे एक विधानसभेत असलेले नाव हे तालुक्यातील दुसऱ्या विधानसभेत शोधत नाही. शहरात असलेले नाव हे ग्रामीण भागात असलेल्या मतदान यादीत शोधत नाही. यामुळे अनेक मतदार शहरात व ग्रामीण भागात मतदान करतात. या मतदारांची आकडेवारी धक्कादायक असल्याचे डॉ. आरोटे यांनी सांगितले.
मतदान यादी जो पर्यंत पारदर्शक आणि सुसुत्रताबध्द होत नाही, तो पर्यंत लोकशाही प्रबळ होणार नाही. प्रशासकीय कामातील चुकांचा फायदा घेऊन व्यवस्थेत भ्रष्टाचार करणारे आणि लोकशाहीला फसवणारे अनेक महाभाग आहेत. हे निदर्शनास आलेले आहे.
त्या महाभागांना आळा आणता यावा, प्रशासनाकडुन नियमात मतदान यादी कामकाज व्हावे, यासाठी आपण याद्यांची पडताळणी केली आहे. जिल्ह्यातील सर्व दुबार मतदारांवर आपला आक्षेप आहे, असे डॉ. आरोटे यांनी सांगितले.