Ahmednagar News : मुलास मारहाण केल्याप्रकरणी पित्यास भादंवि कलम ३२४ नुसार दोषी धरुन दीड वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नवनाथ पोपट काळे (वय ५२, रा. जामगाव, ता. पारनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
नगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. ५) एस. व्ही. सहारे यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केला. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकिल विष्णूदास के. भोर्डे यांनी काम पाहिले.
खटल्याची थोडक्यात हकिगत अशी की, आरोपी नवनाथ काळे हे फिर्यादीचे वडिल आहेत. आरोपीला या पूर्वी त्याच्या पत्नीवर हल्ल्याप्रकरणी शिक्षा झाली होती. ती शिक्षा भोगून झाल्यानंतर आरोपी हा वेळोवेळी फिर्यादी, त्याची पत्नी तसेच त्याच्या आई कडे घरामध्ये राहण्यास आग्रह करत असे.
१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आरोपी नवनाथ पोपट काळे हा त्याची आई रतनबाई हिच्याबरोबर बोलत असताना तेथे फिर्यादी निहाल काळे आले. मी वडिलांना घरात घेणार नाही, ते विनाकारण त्रास देतात, त्यांनी यापूर्वीदेखील आईला मारहाण केली,
माझा त्यांच्यावर भरोसा नाही, असे ते म्हणाले. आरोपीला याचा राग येवून त्याने त्याच्याकडील चाकू फिर्यादीच्या पोटात खुपसून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादी जखमी झाले. तद्नंतर तुला मारुन टाकिन, तुला सोडणार नाही, अशी आरोपीने फिर्यादीला धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादीने भादंवि कलम ३०७, ३४ प्रमाणे पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले.
सदरच्या खटल्यात एकूण ७ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. विष्णूदास के. भोर्डे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. कोर्टाने भादंवि कलम ३०७ ऐवजी ३२४ प्रमाणे दोषी धरत आरोपीला वरीलप्रकारची शिक्षा ठोठावली.