अहमदनगर बातम्या

सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या वीस हजार रुपयांचे घेतले तब्बल दीड लाख रुपये!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  व्याजाने घेतलेल्या २० हजार रुपयांपोटी तब्बल दीड लाख रुपये देऊनही आणखी पैशाची मागणी करणाऱ्या सावकाराच्या जाचास कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील राजापूर या गावात घडली आहे.

अण्णासाहेब निवृत्ती नवले (वय ४३, रा. राजापूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकारणी मृत नवले यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेरमधील सुदाम दुधे (रा. नेहरु चौक) व बालकिसन (पूर्ण नाव माहिती नाही) (रा. देवाचा मळा, संगमनेर) या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या अण्णासाहेब नवले यांनी आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्याकरीता दुधे व बालकिसन यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते.

दरवेळी या पैशाची परतफेड करत त्यांनी तब्बल दीड लाख रुपये या सावकारांना दिले; मात्र त्यांच्याकडून आणखी व्याजाची अवास्तव मागणी सुरुच होती.

सावकारांच्या सातत्याने केल्या जाणाऱ्या आर्थिक मागणीला कंटाळून नवले यांनी अखेर राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर नातेवाईकांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Ahmednagarlive24 Office