Ahmednagar News : शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावच्या शिवारात गुरुवारी (दि.४) सकाळी घडली. मोहन खिराजी दांगडे (वय ६५, रा. हंदार मळा, वाळकी, ता. नगर) असे मयताचे नाव आहे.
वाळकी गावच्या शिवारात हंदार मळा तलाव असून या तलावालगत दांगडे वस्ती तसेच तेथून काही अंतरावर तिरमली समाजाची वस्ती आहे. या वस्तीकडे जाण्यासाठी तलावाजवळून रस्ता आहे. गुरुवारी (दि.४) सकाळी तिरमली वस्ती वरील एकाबरोबर मोहन दांगडे यांचा वाद झाला.
या वादाचे पर्यावसन पुढे हाणामारीत झाले. यामध्ये दांगडे यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करण्यात आली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
ही माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पोलिस पथकासह जिल्हा रुग्णालयात धाव घेत मृताच्या नातेवाईकांकडून व तेथे उपस्थित वाळकीच्या काही नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली.
या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या खबरेवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मयत दांगडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन बंधू, दोन बहिणी, सून नातवंडे असा परिवार आहे.