Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी, चिचोंडी, जवखेडेखालसा, दगडवाडी, धारवाडी, डोंगरवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, रेणुकावाडी, या पश्चिम भागातील ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले.
तर करंजीत मात्र दोन घटना घडल्या. यामध्ये सुनील कांतीलाल गांधी (वय ४८) हे मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर येत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मतदानासाठी घरी येऊन दमदाटी करत मारहाण केल्यामुळे नवनाथ निवृत्ती सुतार यांनी मोना अभयकुमार गुगळे याच्याविरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
करंजीमध्ये सकाळपासूनच मतदारांचा मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. मतदान प्रक्रिया साडेपाच वाजता शांततेत पार पडली. एकूण ८४ टक्के मतदान झाले. निवडणुकीमध्ये नशीम रफिक शेख व विजया आबासाहेब अकोलकर, या दोघींमध्ये सरपंच पदासाठी काटे की टक्कर असून, या दोघींसह त्यांच्या इतर सदस्य पदाच्या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद झाले आहे.
दोन्ही गटांकडून विजयाची खात्री दिली जात आहे. चिचोंडी येथेही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, ८४ टक्के मतदान झाले. या ठिकाणी श्रीकांत एकनाथ आटकर व विष्णू गंडाळ यांच्यात सरपंच पदाची लढत झाली असून, त्यांच्यासह इतरही सदस्यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद झाले आहे.
दगडवाडी येथे स्वाती सचिन शिंदे व उषा सुभाष शिंदे या दोघींमध्ये काटे की टक्कर होणार असून, या ठिकाणी देखील ८४ टक्के मतदान झाले. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवखेडे खालसा तसेच इतर गावांतही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.