अहमदनगर बातम्या

दोन वाहनांच्या अपघातात एक ठार, एक जखमी, नगर – सोलापूर महामार्गावरील घटना !

Published by
Ahmednagarlive24 Office

मिरजगाव नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजगाव शिवारात बाह्यवळणावर पंचर झालेला टायर बदलत असणाऱ्या पिकअप टेम्पोला आयशर टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या पिकअप टेम्पोच्या अपघातात ड्रायव्हर जागीच ठार झाला.

तर आयशर टेम्पोचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.२७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात पिकअपचा चालक महेश भगवान मोरे (वय २४, रा. जामखेड, जि. नगर) हा जागीच ठार झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अहमदनगरकडून रवा घेऊन जामखेडकडे जाणाऱ्या पिकअप क्रमांक सीडी ५४३१, मिरजगाव बाह्य वळणावर पंचर झाला, टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेण्याऐवजी ड्रायव्हरने महामार्गावरच टायर बदलला.

बदललेला टायर मागे गाडीत टाकत असताना पाठीमागून अहमदनगरकडून भरधाव आलेल्या आयशर टेम्पो एमएच १८ बीजी १५८० ने जोराची धडक दिल्याने पिकअप महामार्गाच्या बाजूला जाऊन उलटला तर आयशर टेम्पो महामार्गाच्या बाजूला खड्डयात उलटला.

या अपघातात पिकअपचा ड्रायव्हर जागीच ठार झाला तर आयशर टेम्पोचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. अपघातानंतर नागरिकांनी जखमींना उपचारासाठी नगरला हलवले. अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी हजर झाले. याबाबत अधिक तपास हवालदार शंकर रोकडे करत आहेत.

महामार्ग पोलिसांची बघ्याची भूमिका

नगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग होऊन काही दिवस उलट नाही, तोच या महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू झाले. यामागे चालकाचा बेफीकीरपणा कारणीभूत आहे. महामार्गावर वाहन चालवताना महामार्गाचे कसलेही नियम चालक पाळत नाहीत.

महामार्गाचे काम होण्याआधी महामार्ग पोलिस दिवसभर वाहनांची तपासणी करत होते. परंतु नव्याने महामार्ग झाल्याने महामार्ग पोलिस या महामार्गावर फिरकत नाहीत, त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना धाक न राहिल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत महामार्ग पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office