अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- भरधाव ट्रॅक्टरने मोटरसायकल चिरडण्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.या घटनेमध्ये एक जण जागीच ठार झाला असून एक जण जखमी झाला.
ही घटना टेंभुर्णी पोलिस स्टेशन हद्दीत घडली. या अपघाताच्या घटनेमध्ये जामखेड तालुक्यातील हळगावमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील हळगाव येथील अजिनाथ भानुदास खोटे व उत्तम तात्याबा ढवळे हे दोघे जण मोटारसायकलवर (एमएच १६1एन २३३९ ) हळगावहून पंढरपूरला औषधे आणण्यासाठी गेले होते.
पंढरपूर येथील जोशी आयुर्वेदिक हाॅस्पीटलमधून मधुमेहाची (शुगर) औषधे घेऊन दोघे सोलापुर – पुणे हायवेवरून गावी परतत असताना करमाळा ब्रीज खालून जाण्याऐवजी चुकून कुर्डूवाडी ब्रीज खालून कुर्डूवाडी रोडवर बरेच पुढे गेले.
बऱ्याच वेळानंतर रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले. परत गाडी वळवून गावाकडे निघाले असता पाठीमागुन भरधाव आलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरने (एमएच ४५एस३१२९ ) मोटारसायकलला चिरडले.
या अपघातात अजिनाथ खोटे (वय ६९) हे जागीच ठार झाले तर उत्तम ढवळे (वय६५) हे जखमी झाले. त्यांच्यावर टेंभुर्णी येथील पाटील हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.
ही घटना कुर्डूवाडी- टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावच्या शिवारात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयत अजिनाथ खोटे यांचा मुलगा संभाजी खोटे याने टेंभुर्णी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून
ट्रॅक्टर चालक नवनाथ आगतराव माळी (रा.परिते, ता.माढा, जि .सोलापूर) याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत