Ahmednagar News: गुरुवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत ४० हजार ९५ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ७०० ते ३००० रुपये असा दर मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी काहीसे नाखूष झाले आहेत.
सध्या दुधाचे देखील मोठ्या प्रमाणात भाव पडले आहेत.मात्र पशुखाद्याचे दर वाढले आहेत, त्यामुळे एकीकडे खर्च वाढला असून त्या तुलनेत उत्पन्न कमी मिळत आहे. पर्यायाने दूध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कमी झालेल्या दूध दरामुळे अनेकजण हा व्यवसाय बंद करण्याच्या मानसिकतेत आहेत.
त्यात मागील वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. मात्र तरी देखील निसर्गावर मात करत कांद्याचे पीक घेतले. यासाठी महागडे बियाणे, खते, औषधे आदीचा खर्च केला ऐन कांदा काढणीच्यावेळी कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली.
त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ आहेत त्यांनी कांदा विक्री कारण्याऐवजी साठवणूक केला. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नव्हती त्यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागला. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
आता खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीची वेळ आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना रासायनिक खते, फवारणीसाठी विविध औषधे घ्यावी लागणार आहेत त्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कांदा विकावा लागत आहे. मात्र सध्या कांद्याचे दर कधी कमी तर कधी जास्त होत आहेत. त्यामुळे कांदा विक्री करावा कि नाही या द्विधा मानसिकतेत शेतकरी सापडला आहे.
दरम्यान गुरुवारी नगरच्या बाजार समितीत ७२ हजार ८९९ गोण्यात भरून आलेल्या ४० हजार ९५ क्विंटल कांद्याला ७०० ते ३००० रुपये असा भाव मिळाला. यातील १ नंबरच्या कांद्याला २५०० ते ३०००, २ नंबरच्या कांद्याला १७०० ते २५००, ३ नंबरच्या कांद्याला १००० ते १७००, तर ४ नंबरच्या कांद्याला ७०० ते १००० असा भाव मिळाला.
दरम्यान यावेळी उच्च प्रतीचा ८७ गोणी कांदा या लिलावात आला होता. या कांद्याला ३२०० रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. नांगराच्या बाजारात हा सध्या कांद्याला सर्वात जास्त मिळालेला भाव आहे.