पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, आदिनाथनगर, हनुमान टाकळी, पाडळी, परिसरात अवकाळी पाऊस आणि धुक्याने रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगामुळे पिकांवर संक्रांत आली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याअभावी रब्बी पिकांची शाश्वती नाही. त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला,
ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही उत्पन्नात घट होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला होता.
त्यात उत्तरा नक्षत्रात झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांच्या आशा पल्लवित होऊन शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. उत्तरा नक्षत्रातील पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, मका पिकांची पेरणी तर कांदा, लसणाची लागवड करण्यात आली.
मात्र हवामान बदलामुळे कांदा, तूर, ज्वारी, हर गहू व इतर पिकांवर विविध रोगांचा प्रादुभाव दिसून येत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकावर रोगराई वाढत असून, अनेक ठिकाणी पिके पिवळे पडू लागली आहेत.
खराब हवामानामुळे गहू पिकावर मावा, तुडतुडे, तांभेरा तर ज्वारी, मका पिकावर लष्करी अळी, कांदा पिकावर मावा, तुडतुडे, डाऊनी, करपा, या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. काढणीला आलेल्या कांद्याची सड होण्याची शक्यता आहे.
लसूण पिकावर मावा, तुडतुडे, करपा, हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तूर, टोमॅटो, भेंडी, वांगे, पालेभाज्यांवरही अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.