Ahmedngar News : अहमदनगरमध्ये १२ प्रकल्पात २५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक, साडेतीन लाख लोकांसाठी टँकर

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmedngar News : अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर पाण्याचे एकूण १२ प्रकल्प आहेत. यामध्ये मुळा, भंडारदरा, निळवंडे हे मोठे प्रकल्प आहेत. तर इतर ९ लहान प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची क्षमता ५७.४५ टीएमसी आहे.

परंतु मागील वर्षी पावसाचे राहिलेले अत्यल्प प्रमाण, उष्णेतेमुळे वाढते बाष्पीभवन, जायकवाडीला सोडलेले पाणी आदी कारणामुळे या सर्व प्रकल्पातील एकूण सरासरी उपयुक्त साठा अवघा २५.१९ (१४.४७ टीएमसी) राहिला आहे.

मुळा धरणावर अवलंबून असलेल्या नगर शहरासह उद्योगांच्या पाणी आरक्षणात २० टक्क्यांची कपात करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ लाख ६ हजार लोकसंख्येला १४९ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या मोठ्या प्रकल्पातून जायकवाडीला पाणी देण्यात आले होते. त्यामुळे मुळा धरणातून सिंचनासाठी दिले जाणारे आवर्तन ३० दिवसांचे करण्यात आले. उष्णतेमुळे या धरणातून दररोज सुमारे ५६८ दलघफू पाण्याची वाफ होत आहे.

याव्यतिरिक्त मांडओहळ, पारगाव प्रकल्पात उपयुक्त साठा शिल्लक नाही. तर घोड धरणात अवघा २३.२९ टक्के जलसाठा आहे. तसेच मुळा धरणात ३२.११ टक्के, भंडारदरा ३८.५९ व निळवंडेत १६.७८ टक्केच वापरायोग्य उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

जिल्ह्यातील ‘ही’ आहेत १२ जलप्रकल्प

जिल्ह्यात भंडारदरा (११ टीएमसी), मुळा (२६ टीएमसी), निळवंडे (८.३ टीएमसी), आढळा (१.०६), मांडओहोळ (०.३९९ टीएमसी), घा. पारगाव (०.४३७ टीएमसी), घोड (५.९ टीएमसी), सीना (२.४ टीएमसी), खैरी (०.५३३ टीएमसी), विसापूर (०.९०५), मुसळवाडी (०.१८९), टाकळीभान (०.१९७ टीएमसी)

‘असे’ केले आहे प्रशासनाने पाणी नियोजन

जिल्हाधिकाऱ्यांनी ५०० दलघफू पाणी टंचाई निवारणार्थ आरक्षीत केले आहे. याव्यतिरिक्त ३० जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन करताना पिण्यासह औद्योगिक वापराच्या पाण्यात २० टक्के कपात केली असल्याची माहिती मुळा धरणविभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तसेच, गजरेनुसार टँकरला मंजुरी, जिल्हा परीषदेत टंचाई निवारणार्थ कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात गावांसाठी ४३ तर टँकर भरण्यासाठी १८ अशा एकूण ६१ विहिरींचे अधीग्रहण करण्यात आले असल्याचीही माहिती मिळाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe