Mula Dam Water Stock : राहुरी तालुक्यातील जिल्ह्याला वरदान ठरलेल्या व सुमारे २६ हजार दशलक्ष घनफुट साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सद्यस्थितीला ९ हजार १७५ दशलक्ष घनफूट (३५ टक्के) इतके पाणी शिल्लक राहिले आहे.
तर मृतसाठा वगळता ४ हजार ६७५ दशलक्ष घनफुट (२१ टक्के) पाणीसाठा आहे. उन्हाची तीव्रता अजूनही वाढत असल्याने धरणावरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्या धरणाचा जिवंत पाणीसाठा ४ हजार ६७५ दशलक्ष (२१ टक्के) घनफूट इतका आहे. यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून धरणसाठा पूर्ण क्षमतेने भरत होता.
परंतु यावेळी मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. मागील वर्षी मान्सून काळात धरण लाभक्षेत्रात वरुण राजाची हजेरी कमी प्रमाणात झाल्याने यावर्षी पाणी टंचाई जाणवणार याची सुरुवातीपासून चर्चा होती.
तसेच यापूर्वी मुळा धरणातून पाणी सोडून मुळा नदीवरील बंधारे भरून देण्यात आल्याने नदीकाठावरील शेतकरी वर्गाला पाण्याची तीव्रता कमी प्रमाणात भासत होती.
अनेक वर्षांनंतर शेतकऱ्यांना हवे तेव्हा आवर्तन देखील मिळाले. सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे. दोन्ही कालव्यांना सोडलेले पाणी खर्च झाल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. या कालव्याचे आवर्तनही अंतिम टप्प्यात आले असून, त्यानंतरचा साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच वापरला जाणार आहे. त्यामुळे २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मुळा धरणात आता ९ हजार १७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मान्सूनच्या आगमनाची गरज निर्माण होणार आहे.
धरणाचा साठा ३५ टक्के असून मृतसाठा ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट आहे. अशा परिस्थितीमुळे धरणात असलेल्या ४ हजार ६७५ दशलक्ष घनफूट या उपयुक्त पाणीसाठ्यातून पिण्याच्या पाण्याची गरज भागविली जाणार आहे. पिण्यासाठी मुळा धरणावर नगर शहर, औद्योगिक वसाहत, राहुरी व देवळाली पालिका तसेच ६ पाणी योजनांना एकूण १० ते १२ दशलक्ष घनफूट पाणी दैनदिन लागते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक नसला, तरी पाणीपातळी अजून खालावल्यास पाणी उपसा करणे जिकरीचे ठरणार आहे.
नगर शहर व औद्योगिक भागातील पाणी योजनेचे यंत्रक तळात असून त्याच्यालगत नगरपालिका व पाणीयोजनांना पाणी उपसा होण्यासाठी यंत्रके उभारली आहेत. पाणी योजनाचे यंत्रके पाणी उपसा करताना तळातील पाणी उपसा करीत असल्याने पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळासह घाणही अधिक प्रमाणात येत आहे.
पाणीसाठा ठराविक मर्यादेत असल्यास धरण जिल्हाधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात येते. सध्या जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक सुरू असल्याने पाण्याच्या टंचाईकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. १३ मे ला मतदान झाल्यानंतर पाणी प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे सध्या उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असून अजून ७०० एमसीएफटी पर्यंत वापर होईल. उन्हाळ्याची तीव्रता असल्याने बाष्पीभवन जास्त प्रमाणात होत आहे. परंतु पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण येणार नाही, असे मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.