अहमदनगर बातम्या

वंचितांच्या कर्जमाफीची फक्त घोषणाच, पोर्टल अजूनही बंद ! संपूर्ण प्रक्रिया ठप्प…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेतकरी कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ज्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारने केली होती. या घोषणेमुळे जिल्ह्यात कर्जमाफीपासून वंचित राहिलेलेल्या ५६ हजार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत जाल्या आहेत.

परंतु, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणासाठीचे संकेतस्थळ बंद असल्याने संपूर्ण प्रक्रिया ठप्प आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकार विभागाकडे याबाबत वरिष्ठ स्तरावरून सूचना देण्यात आल्या नाहीत.

शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३ लाख १३ हजार ७०७ शेतकऱ्यांची खाती शासनाला पाठवण्यात आली होती. त्यावर शासनाने २ लाख ९५ हजार ६७२ शेतकरी पात्र ठरवले. पैकी २ लाख ८८ हजार २९६ थकबाकीदार शेतकऱ्यांना १७५२ कोटी ३१ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. परंतु पात्र असूनही आधार प्रमाणिकरण न झालेले १९६२ व पात्र असलेले ५ हजार ४११ अकरा शेतकरी वंचित राहिले होते.

तसेच २०२२ मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले. या योजनेतही १ लाख ४९ हजार २७९ शेतकरी पात्र ठरले. तथापि लाभ मात्र अवघ्या १ लाख ८ हजार ९२९ शेतकऱ्यांनांच मिळाला.

या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने ३६३ कोटी रुपयांचे प्रोत्साहन दिले, परंतु, शासनाने या योजनेतील पात्र ३८ हजार ८९३ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणिकरणासाठी पाठवली नाही. तर ८७२५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण होऊनही पैसे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून समजली.

या वंचित शेतकऱ्यांना सरकारच्या घोषणेमुळे माफी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, प्रशासकीय दिरंगाई होत असल्याने, वंचितांना अद्याप लाभ मिळण्यास विलंब होत होत आहे. पोर्टल सुरू झाल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळेल.

पोर्टल बंद असल्याने अडचण

सहकार खात्याने पात्र शेतकऱ्यांची खाती अपलोड केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणिकरणासाठी पाठवली जाते. प्रमाणिकरण झाल्यानंतर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. परंतु, सद्यस्थिती पोर्टल बंद असल्याने लाभापासन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले आहे.

जिल्ह्यातील लाभाचा आकडा गुलदस्त्यात

शेतकरी कर्जमाफीतील पात्र १ हजार १६२ तर प्रोत्साहन योजनेतील सुमारे १ हजा ४३८ कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले नाही. पोर्टल बंद असल्याने प्रमाणिकरण होऊ शकले नाही. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खाती रक्कम जमा झाल्याचा आकडा जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधकांकडे उपलब्ध नाही.

Ahmednagarlive24 Office