ऑपरेशन मुस्कान : ११०० जणांचा लागला शोध

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेत पोलिसांनी बालके, महिला व पुरुष अशा एक हजार 88 जणांचा शोध घेतला आहे.

तर रेकॉर्डवर नसलेल्या 47 बालके मिळून आली असून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली.

ही मोहिम पुढील 26 जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यामध्ये ऑपरेशन मुस्कान मोहिम राबविण्यात आली.

यासंदर्भात केलेल्या कामगिरीची माहिती अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. बालकांचे अपहरण केल्याचे जिल्ह्यात 200 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 77 बालकांचा ऑपरेशन मुस्कान मोहिमेत शोध घेण्यात आला.

तसेच पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एक हजार 210 महिलांपैकी 621 व एक हजार 91 पुरूषांपैकी 390 जणांचा शोध घेण्यात आला.

पोलिसांची मोहिम सुरू असताना नगर शहर व जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड बाहेरील 47 मुले पोलिसांना मिळून आली. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.

पोलीस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक दिपालीकाळे, प्रांजली सोनवने, नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक बाजीराव पवार,

पोलीस हेडकॅन्टेबल सोमनाथ कांबळे, अर्चना काळे, रिना म्हस्के, मोनाली घुटे, छाया रांधवन, रुपाली लोहारे यांचा पथकाने कारवाई केली.

अहमदनगर लाईव्ह 24