अहमदनगर बातम्या

अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्तावाला विरोध ! चोंडी किंवा जामखेडला…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजूरीला समाजवादी पार्टीच्या वतीने विरोध करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. अहमदनगर या नावाला विरोध का, याचा जाहीर खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी करून इतिहासप्रेमी आणि समाजवादीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

५३४ वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामांतर करू नये. प्रशासक असलेल्या आयुक्तांनी नामांतराचा मंजूर केलेला प्रस्ताव त्वरीत रद्द करण्याची मागणीही समाजवादी पार्टीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांना दिलेल्या निवेदनात केली आले.

यावेळी समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन, सलीम सहारा, आसिफ रजा आदी उपस्थित होते. महापालिका सभागृह विसर्जित असताना एकट्या आयुक्तांनी कोणत्या अधिकाराच्या व कोणत्या कायद्यांतर्गत बेकायदेशीर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला ?

बेकायदेशीर व मनमानी पध्दतीने नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोपही समाजवादीच्या वतीने करण्यात आला आहे. ज्या राजाने शहर वसविले, त्या राजाचे नाव शहराला आहे.

कोणाला खुश करण्यासाठी किंवा कोणाच्या दबावाखाली हा ठराव पारित करण्यात आला. मुळात आरक्षणाची वचनपूर्ती करू न शकल्याने एका समाजाची नाराजी दूर करण्यासाठी असे चुकीचे निर्णय घेऊन लक्ष विचलित करण्यात येत आहे.

ज्या शहराच्या नावाला ऐतिहासिक वारसा असेल, त्या ऐतिहासिक शहराचे नाव बदलता येणार नाही, अशी मार्गदर्शक स्पष्ट सूचना असूनही आयुक्तांनी घाईघाईने बेकायदेशीर प्रस्ताव मंजूर केला, असा दावा करत यामागे राजकीय हेतू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा सर्वांना अभिमान व आदर आहे. त्यांचे जन्मस्थान असलेले चोंडी किंवा जामखेडला त्यांचे नाव देण्यात यावे.

Ahmednagarlive24 Office