अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- राजकारणामुळे गावात निर्माण होणारी कटुता, मतभेद टाळण्यासाठी व गावात शांतता भंग होऊ नये म्हणून बेलापूर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव बेलापूर पत्रकार संघासह काही नागरिकांनी मांडला होता.
११९ अर्ज भरलेल्या इच्छुक उमेद्वारांपैकी ८५ उमेदवारांनी बिनविरोध करण्यासाठी संमती दिली. मात्र, उर्वरित ३४ इच्छुकांनी संमती न दिल्याने बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव बारगळला आहे. बेलापूर गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याबाबत प्रयत्न झाले.
प्राथमिक बैठकीत सर्व राजकीय पक्षाने एकमुखी पाठिंबाही दिला होता. अर्ज दाखल केल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे ठरलेही होते. त्याप्रमाणे शुक्रवारी सर्व प्रमुख पक्षीय पदाधिकाऱ्यांसह अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी मुरकुटे, विखे गटाच्या युतीतील सर्व ३५, जनता आघाडीच्या सर्व २५ व काँग्रेसच्या एकूण इच्छुकांपैकी १७ अर्ज आले.
मात्र, इतरांचे आले नाही, तर ८ अपक्ष अशा ८५ इच्छुक उमेदवारांनी बिनविरोधसाठी संमती दिली होती. उर्वरित ३४ उमेदवारांची संमती घेऊन शनिवारी अंतिम निर्णय घेण्याचे ठरले होते. मात्र, उर्वरित इच्छुकांनी संमती न दिल्याने बिनविरोध करण्याचा प्रस्ताव बारगळला.
दरम्यान, सध्यस्थितीत विखे-मुरकुटे गट, जनता आघाडी व काँग्रेस अशा तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. अजूनही या तिघांमध्ये युतीची चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास दुरंगी अन्यथा तिरंगी लढत अटळ आहे.