अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ फळ रोपवाटिकेतील कामगारांना ८२ लाख देण्याचे आदेश !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा (ता. राहाता) तसेच काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील फळ रोपवाटिका मधील रोजंदारी कामगारांना समान कामाला, समान वेतन यानुसार १/ २६ दरानुसार रोजंदारी कामगारांना ८२ लाख रुपये देण्याचे आदेश कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित देशमुख यांनी दिले आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस बाळासाहेब सुरूडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पुणतांबा येथील फळ रोपवाटिका मधील रोजंदारी कामगार सुशीला बोडखे, शांताबाई देठे, सुलोचना ढंगारे, अशोक थोरात यांनी सन २०२१ मध्ये तसेच सन २०२२ मध्ये काष्टी येथील फळ रोपवाटिका येथील शिवाजी ढवाण, बापू शेळके, तुकाराम ढवाण, बंडू राऊत यांनी कामगार न्यायालय, अहमदनगर यांच्यासमोर समान कामाला समान वेतन १/२६ दराने रोजंदारी वेतनाचा सन १९८८ पासूनचा फरक मिळणे कामी आयडीए अर्ज दाखल केले होते.

अहमदनगर जिल्ह्यातील तालुका फळ रोपवाटिका व बीजगुणन केंद्रावरील रोजंदारी कामगारांना समान कामाला समान वेतन १/२६ रोजंदारी दराने वेतन देण्याबाबतचे आदेश औद्योगिक न्यायालय, अहमदनगर व उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद यांनी दिले होते.

परंतु कृषी खात्याने सदर आदेशाची अंमलबजावणी केली नाही, म्हणून कामगार न्यायालय, अहमदनगर यांच्यासमोर यापूर्वी १५० कामगारांनी केसेस दाखल केल्या होत्या. या सर्व केसेस कामगार न्यायालय व उच्च न्यायालय यांनी मंजूर करून याचिकेतील कामगारांना १२ टक्के व्याजासह दोन कोटीची रक्कम सन २०१७-१८ मध्ये कृषी खात्याला अदा करावी लागली होती.

त्यानुसार वरील ८ कामगार सध्या कामावर असून सुद्धा न्यायालयीन आदेश असतांना देखील वेतन फरक त्यांना दिला जात नव्हता. म्हणून कामगार न्यायालयात युनियनच्या वतीने कामगारांनी विवाद दाखल केलेला होता.

सदर विवादात कामगार न्यायालयाने दोन्ही बाजूचे साक्षी पुरावे तपासून ८ कामगारांना ८३ लाख रुपये तीन महिन्यात देण्याचे आदेश करून तीन महिन्यात रक्कम अदा न केल्यास रक्कम अदा होईपर्यंत ६ टक्के व्याज देण्याचे आदेश ३१ ऑगस्ट रोजी केले आहे. कामगार न्यायालयात अर्जदाराच्या वतीने कामगार संघटना प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब सुरुडे व अॅड. के. वाय. मोदगेकर यांनी कामकाज पाहिले आहे.

Ahmednagarlive24 Office