अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- लॉकडाउनच्या नावाखाली गेल्या अनेक दिवसापासून कीर्तन-प्रवचन वगळता सर्व काही अगदी पद्धतशीर सुरु आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय संपवण्याचा डाव कोणी आखला आहे.
की काय असा प्रश्न उपस्थित करत जर आता यापुढे कीर्तन प्रवचन बंद ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास संत महंतासह सर्व वारकऱ्यांना रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही. असा सूचक इशारा वारकरी संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल महाराज वाळके यांनी दिला आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राध्यापक नगर येथे एकादशी प्रवचन शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात वाळके महाराज बोलत होते. यावेळी वाळके महाराज म्हणाले की, कीर्तन प्रवचन सोडून राज्यात सर्व काही व्यवस्थितपणे सुरु आहे. वारी बंद करून बारी सुरू करण्याचा निर्णय शासन घेतय की काय? अशी शंका येते.
अशीच परिस्थिती या पुढे सुरूच राहिली तर डाऊ कंपनी विरोधात ज्या पद्धतीने वारकऱ्यांनी एकत्रित येऊन ही कंपनी हद्दपार केली होती. त्याच पद्धतीचे जनआंदोलन भविष्यकाळात उभे करण्यासाठी सर्वच संत महंत वारकऱ्यांनी आता तयारी करावी असा सूचक इशारा वाळके महाराजांनी दिला.
कीर्तन प्रवचन सारखे पारमार्थिक व सांप्रदायिक कार्यक्रम गेल्या काही दिवसापासून बंद राहिल्याने राज्यात बलात्कार अत्याचार गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असुन, संत विचारांची राज्यातील परंपरा गेल्या काही दिवसापासून थांबली आहे. संस्कार चिंतन-मंथन बंद झाल्याने अनेक अघटित घटना होत आहेत.
त्यामुळे या सर्व गोष्टींचा प्रशासनाने विचार करावा, असे वाळके महाराज म्हणाले. यावेळी परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.