Ahmednagar News : देशात श्रीरामाचे मंदिर होणे हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळेच आम्ही साखर वाटप करत आहोत. काहींना आमची साखर कडू लागत असेल, त्याला आम्ही काही करू शकत नाही. २२ जानेवारीला दिवाळी साजरी होतेय, या सारखा दुसरा आनंद नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे नागरिकांना साखर व डाळीचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते.
दिवाळी साजरी करावी
खा.सुजय विखे पाटील म्हणाले की, ब्राम्हणी गावाच्या व परिसराच्या विकासासाठी आम्ही सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. साखर व डाळ वाटप हा मुद्दा वेगळा आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना होत असताना नैवेद्य म्हणून सर्वांनी दोन लाडू करावेत. एक प्रकारे दिवाळी साजरी करावी, असे त्यांनी सांगितले.
६.५० कोटींचा निधी उपलब्ध
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, की गेल्या महिन्यात खासदार डॉ. विखे पाटील व आम्ही सर्व महिलांना देवदर्शन घडविले. आता साखर व डाळ वाटप होत आहे. विकासाची कामे तर झालीच त्यासाठी सुमारे ६.५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे; परंतु या भावनिक विषयातदेखील आमचा पुढाकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना खासदार करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
विकास कामांसाठी निधी मिळावा
प्रास्तविक करताना विक्रम तांबे यांनी गावातील विकास कामात खासदार डॉ. विखे व माजी मंत्री कर्डिले यांनी मोठा निधी दिल्याचे सांगितले. सरपंच प्रा. सुवर्णा बानकर यांनी गावातील विकास कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली, तसेच पंढरपूर दर्शन व साखर, डाळ दिल्याबद्दल नेत्यांचे आभार मानले.