अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या कोरोनाचा कहर कायम असताना जिल्ह्यात अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव पसरू लागला आहे. यामुळे खासगी रुग्णालये देखील ओव्हरफ्लो होऊ लागली आहे.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसराला हिवताप, सर्दी, खोकला आदींसह अनेक आजारांचा विळखा पडला आहे. आधीच कोरोनाच्या लाटेने त्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला या साथीच्या आजारानेही हैराण केले आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे परिसरात पाण्याचे डबके साचून राहत असल्याने डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सततच्या पावसामुळे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे उद्भवही खराब झाले असून,
हे पाणी सध्या पिण्यास अयोग्य ठरत आहे. गावात गवताचे प्रमाणही खूप वाढले असून, डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावात शासकीय प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे.
या आरोग्य उपकेंद्रामार्फत जंतनाशक गोळ्यांचेही वाटप आहे. मात्र वाढत्या साथीच्या आजारामुळे गावातील खासगी दवाखाने रुग्णांनी फुल झाली आहेत. नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.