अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- राहाता तालुक्यातील दुर्गापूर व संगमनेर तालुक्यातील चिंचपूर येथील वर्षानुवर्षे अतिक्रमण झालेला सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता पाच दिवसांपासून खुला करण्यात आला आहे.
दरम्यान हा रस्ता खुला करण्यासाठी दोन्ही तालुक्यातील यंत्रणेमार्फत प्रयत्न चालू होते. अखेर ‘महसूल विजय सप्तपदी अभियान’ अंतर्गत तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गापूर व चिंचपूर येथील अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला होता.
याबाबत प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींनुसार दोन्ही गावातील संबंधित शेतकरी, सरपंच, पदाधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती, महसूल, मोजणी, पोलीस व ग्रामसेवक यांनी सहभागी होवून निशाणी निश्चित केल्या.
मंडळ अधिकारी श्री.मांढरे, श्रीमती चतुरे, तलाठी स्वाती झुरळे व कानडे, पोलीस पाटील अशोक थेटे, दत्तात्रय तांबे, दिलीप पुलाटे आदिंनी विशेष प्रयत्न केले.
अखेर ‘महसूल विजय सप्तपदी अभियान’ अंतर्गत संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम व राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढून शीवरस्ता खुला करण्यात आला. तसेच, पाणंद रस्ते,
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ता प्रस्तावित करण्याच्या यंत्रणेस नियोजनाबाबत निर्देश दिले आहे. सदरचा प्रश्न निकाली काढल्याने दोन्ही गावांतील नागरिकांनी प्रातिनिधीक स्वरुपात तहसीलदारांचा सत्कार करुन आभार मानले.