अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी काल संसदेतील खासदारांशी संवाद साधला. आपल्या देशामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी व शेतकऱ्यांना सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी गावोगावी देशी बियाण्यांच्या बँक उभा राहिल्या पाहिजे.
शेतकऱ्यांसाठी भरवशाचे आणि शाश्वत बियाणे मिळण्यासाठी गावरान बियाणे वाचवण्याची चळवळ मोठी केली पाहिजे. प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावांमध्ये देशी बियाण्यांच्या बँक निर्माण व्हाव्यात, अशी भावनिक साद सीड मदर पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी घातली.
पद्मश्री पोपेरे म्हणाल्या, भारत देश सशक्त करण्यासाठी गावठी आणि पारंपारिक बियाण्यांपासून तयार केलेल्या भाज्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे, तरच येणारी पिढी सक्षम आणि सुदृढ निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करून त्या म्हणाल्या,
ग्रामीण जनतेकडे भरपूर ज्ञान आणि विद्वत्ता उपलब्ध असून बायफ संस्थेने जसा माझा शोध घेतला व मला मदत केली त्याचप्रमाणे शासनाने ग्रामीण भागातील टॅलेंट शोधून त्यावर काम केले पाहिजे. सामर्थ्यवान भारत निर्माण करण्यासाठी व शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे.
त्यासाठी मी माझे जीवन समर्पित केलेले आहे. मी माझ्या जीवनात एकमेव ध्येय ठेवलेले आहे आणि ते म्हणजे गावरान बियाणे संवर्धन व आपल्या मातीशी इमान राखणे होय. यासोबतच ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज या प्रश्नांनाही राहिबाईंनी अलगद हात घातला व लोकसभा सदस्यांना आपापल्या मतदारसंघांमध्ये गरिबातील गरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचे भावनिक आवाहन केले.
या पुढील आयुष्य समाजासाठी आणि गरीब शेतकऱ्यांसाठी जगायचे आहे. त्यासाठी मी कटिबद्ध आहे. गावोगावी जाऊन तरुण विद्यार्थ्यांची भेट घेणे व त्यांना जैवविविधतेची माहिती देणे तसेच पुढील पिढीला हा मौलिक ठेवा काय आहे व त्याच्या जतन कसे करायचे, याबद्दल मी माहिती देत असते.
मी शाळेत जाऊ शकले नाही; परंतु शाळा माझ्याकडे येते, याचा मला सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. कोंभाळणेसारख्या आदिवासी आणि छोट्याशा गावातून सुरू केलेली देशी वाण व बीज संवर्धनाची चळवळ देशव्यापी बनवण्यासाठी त्यांनी संसदेतील सर्व खासदारांना विनम्र आवाहन केले.