पशुपालकांमध्ये दहशत; बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी बिबट्याने धुमाकूळ घालत कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे.त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव व अकलापूर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत मेंढी व कालवड ठार केल्याची घटना गुरुवारी (ता.28) पहाटेच्या सुमारास घडली आहे.

दिवसेंदिवस पठारभागात बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याने शेतकर्‍यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि,

अकलापूर गावांतर्गत असणार्‍या एलखोपवाडी येथील शेतकरी संतोष दशरथ निमसे यांनी नेहमीप्रमाणे कालवड गोठ्यात बांधली होती. गुरुवारी पहाटे बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत कालवडीवर हल्ला चढवत ठार केले.

तर घारगाव गावांतर्गत असलेल्या कान्होरे मळा येथील महादू रामदास खेमनर या मेंढपाळाच्या वाघुरीत घुसून बिबट्याने एक मेंढी ठार केली आहे.

यापूर्वीही या परिसरात बिबट्याने कालवडीला जखमी केले होते. सतत होणार्‍या हल्ल्यांमुळे शेतकरी व पशुपालक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24