Ahmednagar News : अयोध्येत तब्बल ५०० वर्षांनंतर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेल्या बालस्वरुप रामलल्लाचा अंश नगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये आला आहे. लोकसहभागातून आदर्श हिवरे बाजार गाव घडवणारे पद्मश्री पोपटराव पवार यांचा अनोखा सन्मान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारे करण्यात आला असून,
श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा प्रसाद म्हणून ज्या शिळेपासून (काळा पाषाण) अयोध्येतील रामलल्ला मूर्ती घडवली गेली, त्या शिळेचा छोटासा तुकडा व राम पंचायतन असलेले चांदीचे नाणे त्यांना भेट देण्यात आले आहे.
अयोध्येत मागील २२ जानेवारीला भव्य राममंदिरात बालस्वरुप रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. या कार्यक्रमासाठी पद्मश्री पवार यांना विशेष निमंत्रण होते. त्या सोहळ्यात ते सहभागीही झाले होते. या पार्श्वभूमीवर, ज्या काळ्या पाषाणातून रामलल्लांची मूर्ती साकारली, त्या पाषाणाचा शिलांश पद्मश्री पवारांना प्रसाद रुपाने मिळाल्याने प्रत्यक्ष रामलल्ला हिवरेबाजारमध्ये आल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
(दि. १७ एप्रिल) रामनवमीच्या दिवशी या शिलांशाची शोभायात्रा गावातून काढण्यात येणार आहे. तसेच गावात येत्या १६ ते २३ एप्रिल दरम्यान आयोजित श्रीराम कथा निरुपण सोहळ्यात भाविकांच्या दर्शनासाठी तो ठेवला जाणार आहे. त्यानंतरही सार्वजनिक सुट्टी तसेच प्रमुख सणावारांच्या काळात गावातील मारुती मंदिरात तो दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे.
ज्वालामुखीतील काही लाव्हा बाहेर न येता तो जमिनीच्या आतच राहतो. तो थंड झाल्यावर त्यापासून काळा पाषाण म्हणजेच गॅब्रो तयार होतो. कर्नाटकातील गॅब्रो उत्तम असल्याने या पाषाणाची निवड अयोध्येतील रामलल्ला मूर्ती घडवण्यासाठी केली गेली आहे.
या मूर्तीची झीज होणार नसल्याने पुढील शेकडो वर्षे रामलल्ला तेजस्वी रूपाने भाविकांना दर्शन देणार आहे. याच पाषाणाचा ६ सेंटीमीटर लांब, ३ सेंटीमीटर रुंद व सुमारे दीड सेंटीमीटर जाडीचा तुकडा पद्मश्री पवारांना प्रसाद रुपाने दिला गेला आहे.
त्याचे घनफळ २७ घनसेंटीमीटर म्हणजे २ अधिक ७ मिळून ९ हा भाग्यांक साधला गेल्याची भावना पद्मश्री पवारांची आहे. या शिलांशाच्या रुपाने प्रत्यक्ष रामलल्ला मूर्तीचा अंश घरी आला आहे. समवेत श्रीराम-सीता बसलेले व पाठीमागे भरत-लक्ष्मण उभे आणि पुढे हात जोडून बसलेले
हनुमान व शत्रुघ्न असे श्रीराम पंचायतन चित्र असलेले चांदीचे नाणेही दिले असल्याने आमच्या पवार परिवारासह हिवरे बाजारच्या प्रत्येक रहिवाशाच्या जीवनातील हा अवर्णनीय आनंदक्षण असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.