अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : ‘चुलीत गेला पक्ष आणि चुलीत गेले नेते’चा नारा : राजकीय नेत्यांना गावात ‘नो एन्ट्री’

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून नगर तालुक्यात अनेक गावांनी आक्रमक होत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खासदार, आमदारांसह सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांना गावात ‘नो एन्ट्री केली आहे.

तसे ठरावच गावोगावी घेण्यात आले आहेत. ‘खड्डयात गेला पक्ष आणि खड्डयात गेले नेते, असे म्हणत ‘एकच मिशन मराठा आरक्षण असे फलक गावोगावी झळकायला सुरुवात झाली आहे.

मराठा आरक्षणामुळे वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. सरकारला आरक्षणासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले, त्याचे पडसाद थेट नगर तालुक्यात दिसून येत आहेत.

तालुक्यातही मराठा समाजातर्फे गावोगावी राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. समाजातर्फे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येत आहेत. साखळी उपोषण, राजकीय नेत्यांना गावबंदी, राजकीय सभा, कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्यात येत आहे.

जेऊरमध्ये नेत्यांना प्रवेश बंदीचे बॅनर लावण्यात आले आहेत. समाजातर्फे करण्यात येत असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ आरक्षण देण्याची मागणी जेऊर येथील तरुणांतर्फे करण्यात आली.

आरक्षणासाठी अनेक मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकारकडून दखल घेतली जात नाही, सरकारला आणखी किती बळी हवे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया इमामपूर ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या गावात पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’

नगर तालुक्यातील जेऊर, चास, इमामपूर, भातोडी, मदडगाव, राळेगण म्हसोबा, टाकळी काझी, खडकी, पारेवाडी, वाकोडी, सांडवे, दशमी गव्हाण, बहिरवाडी या गावांनी फलक लावून राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घातली आहे.

Ahmednagarlive24 Office