अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- बुरुडगांव रोड येथे राहणारे शिक्षक सतीश गुगळे यांच्या बांबू हाऊसची ख्याती आता राज्य आणि देश पातळीवर पोहचली आहे. बांबू वापरुन स्वस्तात दुमजली घर बांधता येते, हे पाहून अनेकजण आश्चर्य चकित झाले.
अशा प्रकारची पर्यावरणपूरक घरे बांधली गेली तर खर्च तर वाचेलच शिवाय बांबूला मागणी वाढेल. माजी आमदार व राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय पाशा पटेल यांनी सतीश गुगळे यांच्या बांबू हाऊसला सदिच्य भेट दिली व त्यातील बारकावे समजून घेतले.
लोखंडी सळ्यांऐवजी आरसीसी बांधकामातील बांबूचा वापर, सोबत कॅविटी वॉल वीट काम, बायोगॅस प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग,25% सिमेंटचा कमी वापर, नैसर्गिक पीओपी, चुन्याचा वापर, नियमित बांधकाम खर्चामध्ये 30 ते 40 टक्के बचत सोबतच बांबूच्या वापरामुळे पर्यावरणाचा प्रदूषण कमी करण्यासाठी,
कार्बन डायॉक्साईड कमी करण्यासाठी, उर्जेची बचत करण्यासाठी लोखंडाला पर्याय उपलब्ध होत असल्याने देशातील सर्वसामान्य व्यक्तींसाठी शासनाच्या इंदिरा आवास मॉडेलला एक वेगळा पर्याय बांबूच्या घराच्या रुपाने याठिकाणी मिळू शकतो हे निदर्शनास आल्याने पाशा पटेल हे खूपच प्रभावित झाले.
आणि त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व आत्मीयतेने बांबू हाऊस चा विषय समजून घेतला. यावेळी अतुल देऊळगावकर या पर्यावरणात काम करणार्या लेखकास त्यांनी प्रत्यक्ष फोन लावून व्हिडिओ कॉल करून बांबू हाऊस दाखविले. पुढील भविष्यामध्ये बांबू संवर्धन या देशव्यापी उपक्रमांमध्ये आपण मिळून काम करू या असे आश्वासन पाशा पटेल यांनी सतीश गुगळे यांना दिले .
याप्रसंगी पाशा पटेल म्हणाले, बांबू हाऊस ’कल्पतरू’ अहमदनगर खूप ऐकून होतो .आज प्रत्यक्षात घराला भेट देण्याचा योग आला .घर बांधतानाची जिज्ञासा, बांबूचा उपयोग बांबूचा टिकाऊपणा, लॉरी बेकर्सच्या पुस्तकातील उतार्यांचा उपयोग कौशल्याने प्रत्यक्षात उतरलेला पाहून मनस्वी आनंद झाला.
अशी ध्येयवेडी माणसेच समाजाचा व देशाचं भलं करू शकतात. देशातील पर्यावरणावर काम करणार्या सर्व तज्ञांनी या शिक्षकाला भेटावे असे मला वाटते. पर्यावरणाच्या लढाईत आपण दिशादर्शक म्हणून कार्य करत असल्याचे सांगून कौतुक केले.
यापूर्वीही इस्त्रोचे संशोधक धनेश बोरा, पुण्याचे आर्कि.रवी गर्दे, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे प्रतिनिधी सुहास चव्हाण, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपसंचालक राजेंद्र चव्हाण, राजस्थानमधील आदर्शगांव पिपलांत्री गावचे सरपंच शामसुंदर पालिवाल आदिंसह सुमारे 10 लोकांनी या बंबू हाऊसला भेट दिली आहे.