अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- गेल्या अनेक महिन्यांपासून नगर जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
तसेच या भक्षक बिबट्याने प्राण्यांवर देखील हल्ले करत त्यांना ठार केले आहे. नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद शिवारात बिबट्याने कुत्र्याला फस्त केले आहे.
तसेच एका चारचाकी वाहनावर देखील बिबट्याने झेप घेतली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,
श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद शिवारात नानेकर वस्तीलगत बाबासाहेब लांडे यांच्या कुत्र्याला पहाटेच्या सुमारास घराच्या ओट्यावरून खेचत नेऊन फस्त केले.
या घटनेमुळे जाफराबाद ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नायगाव येथील भाजपाचे कार्यकर्ते शैलेश खाटेकर,
संदिप सदाफुले हे रात्री १० च्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनातुन निमगांव खैरी शिवारातुन नायगांवला घरी परतत असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेतली.
सुदैवाने चारचाकी वाहन असल्याने बचावलो असल्याची प्रतिक्रिया शैलेश खाटेकर यांनी दिली. भयभीत नागरिकांनी सदर बिबट्यास त्वरीत जेरबंद करण्याची मागणी केली आहे.