Ahmednagar News : पाथर्डी यावर्षी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने खरीपाची पिके पावसाअभावी जळून गेली. रब्बी पिकांची पेरणी नाही. सध्या चारा व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे,
त्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्याचा दुष्काळी तालुक्याच्या यादीत सामावेश करून दुष्काळी उपाययोजना तातडीने लागू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबत लवकरच फेरआढावा घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे अश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी या वेळी दिले.
मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर आमदार मोनिका राजळे व भाजपाचे शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणुक प्रमुख नारायण पालवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करून सविस्तर माहिती दिली.
याबाबात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील इतर दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांप्रमाणेच पाथर्डी व शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर होणे अत्यंत गरजेचे आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे.
विशेषतः पाथर्डी व शेवगाव तालुक्यामध्ये अत्यंत अल्प पाऊस झालेला आहे. दोन्ही तालुक्यांतील सर्व महसूल मंडळातील खरीपाची पिके वाया गेली असून, रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याही झाल्या नाहीत.
त्यामुळे दोन्ही तालुके दुष्काळी परिस्थितीच्या निकषांत बसत असूनही संबंधीत कंपनीच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे पाथर्डी व शेवगाव तालुके दुष्काळी उपाययोजनापांसून वंचीत राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या तालुक्यातील सर्व बंधारे, पाझरतलाव, के. टी. वेअर बंधारे, विहीरी, नद्या, नाले कोरडेठाक पडले आहेत, त्यामुळे शासकीय धोरणात्मक निकषांची, केंद्र शासन संहीता निर्देशांक, कृषी व महसूल विभागाचे सत्याता पाहणी,
या सर्व बाबींचा फेरविचार होऊन दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करुन, जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यमानाची तुट उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष व वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती, या सर्व घटकांचा अभ्यास करावा
व कृषी, महसूल, मदत व पुर्नवसन विभागाने यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन पाथर्डी व शेवगाव तालुके दुष्काळी जाहीर करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही आमदार मोनिका राजळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.